शीर्षासन म्हणजे काय ? |शीर्षासन मराठी माहिती
शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोके किंवा मस्तक. या आसनात संपूर्ण भार डोक्यावर तोलून उलटे उभे राहिले जाते म्हणून या आसनास शीर्षासन असे म्हणतात. या आसनात खाली डोके वर पाय अश्या स्थितीत शरीर असते. हे आसन करण्यास भरपूर सराव करावा लागतो पण तेवढेच जास्त याचे फायदे देखिल आहेत म्हणून यास आसनांचा राजा असेही म्हटले जाते.
शीर्षासन करण्याची पद्धत :
- सर्वप्रथम जमिनीवर जाड आसनावर दोन्ही पाय दुमडून वज्रासनात बसावे.
- समोर वाकून दोन्ही कोपर जमिनीवर टेकवून दोन्ही हातांची बोट एकमेकांत गुंफून हात जमिनीवर ठेवावे.
- हाताच्या तळव्यांच्या आधारे डोके जमिनीवर ठेवावे.
- आता गुडघे व कंबर वर उचलत पाय चेहऱ्याच्या दिशेने पुढे आणावेत जेणे करून शरीराचा तोल ड्योक्यावर येईल .
- यानंतर दोन्ही पाय वर उचलून उभ्या सरळ स्थितीत ठेवा शिर्षासनाची ही अंतिम स्थिती आहे.
- या आसनात ३-५ मिनिटे किंवा आवश्यकता असल्यास जास्त वेळही स्थिर राहता येईल.
शीर्षासनाचे फायदे :
- जेव्हा आपण शिर्षासन करतो तेव्हा रक्त खालच्या भागातून डोक्याकडे वाहते त्यामुळे मेंदूला भरपूरप्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होतो.या आसनात शरीर उलटे होत असल्याने शरीराच्या वरच्या भागांना पुरेसा रक्तापुरवढा होतो.
- मेंदूमध्ये चांगल्या प्रमाणात रक्तपुरवढा झाल्याने मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. शीर्षासनाच्या सततच्या सरावाने स्मरणशक्ती मध्ये वाढ होते.
- नियमित शीर्षासनाचा सराव केल्यास केस गळणे, केस तुटणे, अवेळी केस पांढरे होणे इत्यादी सामान्य केसांच्या समस्या संपुष्टात येतात आणि केस निरोगी, मजबूत, जाड आणि लांब होतात.
- डोळ्यांचा नसांना पुरेस रक्तचलन झाल्याने डोळ्यांचे आयुष्य सुधारते.
- शीर्षासनाच्या सरावामुळे मन शांत होते.मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की तणाव, नैराश्य आणि चिंता दूर होण्यास मदत होते.
- पचनशक्ती सुधारते व पोटाचे विकार दूर होतात.
- हात, खांदे आणि पाठीचा वरचा भाग यासह शरीराच्या वरच्या अवयवांचे स्नायु मजबुत बनतात.

शीर्षासन करताना घ्यावयाची काळजी:
- उच्च रक्तदाब व हृदय विकार असलेल्या व्यक्तीने हे आसन करणे टाळावे.
- मानेला दुखापत असल्यास हे आसन करू नये.
- मेंदू संबंधित विकार तसेच लठ्ठपणा ने त्रस्त लोकांनी हे आसन करू नये.
- स्पॉंडिलायटिस, सायटिका, मान, पाठ, कंबरेतील विकारांत हे आसन करू नये.
- महिलांनी मासिक पाळी सुरू असताना तसेच गरोदर असताना हे आसन करू नये.
- प्रारंभी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास करावा.